पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात पुणे जिल्ह्यातील तिघांचा समावेश करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी याआधीच शपथविधी घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला चार मंत्री मिळाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील दुसरी महिला मंत्री हाेण्याचा मान मिसाळ यांना मिळाला आहे.
या मंत्रिमंडळात शहरातील कोथरूड मतदारसंघातील चंद्रकांत पाटील आणि इंदापूरचे दत्तात्रय भरणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. पर्वतीच्या माधुरी मिसाळ यांची राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. आंबेगाव मतदारसंघातून सलग आठव्यांदा निवडून आलेले दिलीप वळसे पाटील यांचा मात्र मंत्रिपदावरून पत्ता कट करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धवसेना यांची महाविकास आघाडीविरुद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेसेना यांची महायुती अशीच झाली. यात जिल्ह्यातील २१ पैकी सर्वाधिक नऊ जागांवर भाजपने विजय मिळवला. त्यापाठाेपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिंदेसेना आणि उद्धवसेना यांना प्रत्येकी १ जागा मिळाली आणि जुन्नर मध्ये अपक्ष आमदार शरद सोनवणे निवडून आले आहेत. भाजपने कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. भरणे हे गेल्यावेळेस राज्यमंत्री होते. भरणे यांची बढती झाली आहे. पर्वतीच्या माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यात एकूण चार मंत्री झाले आहेत.
अजित पवारांना शह देण्यासाठी चंद्रकांत पाटील तिसऱ्यांदा मंत्री
बारामतीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार हे राजकारणातील मुरब्बी नेते आहेत. त्यामुळे अजित पवार यांना शह देण्यासाठीच भाजपने कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे दादा विरुद्ध दादा असे समीकरण आगामी काळात पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.
माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रिपद
पर्वती मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून त्या महिला मंत्री आहेत.
वळसे पाटील यांचा पत्ता कट; लांडगे, कांबळे, कुल, शिवतारे नाराज
आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद मिळालेले नाही. त्याचा पत्ता कट झाला आहे. तसेच मावळचे सुनील शेळके यांनाही मंत्री करण्यात आले नाही. त्यामुळे शेळके देखील नाराज झाले आहेत. भाजपने दौंडचे राहुल कुल, आणि भोसरीचे महेश लांडगे यांना मंत्रिमंडळात संधी दिली नाही. त्याचबराेबर शिंदेसेनेचे विजय शिवतारे यांनाही मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे कुल, लांडगे, शिवतारे नाराज झाले आहेत.