पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. भाजपा आणि शिवसेना नेत्यांमध्ये याप्रकरणावरुन खडाजंगी होत आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सुशांतची केस सीबीआयकडे देण्यावरुन प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनावर कडाडून टीका केलीय.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि जस्टिस लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली होत. त्यावर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलंय. शिवसेना संभ्रमित झालीय. बावचळली आहे, त्यामुळे ते काहीही बडबडत आहेत, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
जस्टिस लोया प्रकरणाचा विषय कधीच संपला आहे. हा विषय पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. तर, गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला होता. हे जगाला माहीत आहे. मुंडेंचा अपघात होता हे सर्वांनी स्वीकारलंय. ते उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही, असं सांगतानाच सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण आणि लोया व मुंडे प्रकरणाचा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यामुळे शिवसेना संभ्रमित झाली आहे. संत्रस्त झाली असून ते बावचळल्यासारखे बोलत आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
दरम्यान, या देशात लोकशाही आहे. त्यामुळे लोया आणि मुंडे प्रकरणात कुणाचं काही म्हणणं असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे मागणी करावी. साधं पोस्टकार्ड लिहूनही मागणी करता येते. सीबीआय पोस्टकार्डचीही दखल घेते, करावी मागणी. आमचं काही म्हणणं नाही, असेही ते म्हणाले. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. इकडे मुंबई महापालिकेने बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वॉरंटाइन केलं. म्हणून बिहार भाजपने आदित्य यांच्या नार्को चाचणीची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार सहकार्य करायला तयार नाही म्हणून त्यांनी मागणी केली. पण ही भाजपची अधिकृत मागणी नाही, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.