- नारायण बडगुजर
पिंपरी : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यानंतर चिंचवड पोलीस चौकी बाहेर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची गर्दी झाली. त्याचवेळी चंद्रकांत पाटील समर्थक तेथे आले. त्यामुळे पोलीस चौकी समोर जोरदार घोषणाबाजी झाली.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी चिंचवड पोलीस चौकीसमोर गर्दी केली होती. दरम्यान चंद्रकांत पाटील समर्थक असलेले काही भाजपचे कार्यकर्ते पोलीस चौकी समोर आले. शाईफेक केलेल्यांबाबत त्यांनी पोलिसांकडे विचारणा केली. त्यावेळी चौकी बाहेर असलेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचवेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले त्यानंतर वातावरण निवळले.
शाई फेक करणाऱ्याची ओळख पटली-
बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. शाई फेकणाऱ्याचे मनोज गरबडे असे नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरात परिचित आहे.
मनोज हा पिंपरी-चिंचवड परिसरात समता सैनिक दलासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. डाॅ. बाबाासहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाकडून आयोजित कारण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्याचा पुढाकार असतो. नुकतीच मनोजच्या पुढाकाराने पिंपरीत संविधात जनजगृती अभियान तसेच सहा डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मनोज सोबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन जणांची चौकशी पोलीस चौकशी सुरू आहे.