पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी महापौरपदाच्या उमेदवारीकरिता भाजपाने मुरलीधर मोहोळ यांचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळे आमदारकी नसली कोथरूडच्या मोहोळ यांना महापौरपदाची लॉटरी लागल्यात जमा आहे. ते आज दुपारी 12च्या दरम्यान अर्ज दाखल करतील. याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ हे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी कोथरूडमधून आमदारकी लढवण्यासाठी चांगलीच तयारी केली होती. मात्र अचानक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी 'सेफ' मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड करण्यात आली. दुसरीकडे उमेदवारी गेल्यावरही त्यांनी लांबचा विचार करत पाटील यांचा प्रचार करण्याचा मार्ग स्वीकारला आणि आज त्यांना त्याचेच फळ मिळाल्याचे मानले जात आहे. महापौरपदाच्या सोडतीवेळी खुले आरक्षण आल्यावरच मोहोळ यांचे नाव चर्चेत होते.मोहोळ यांनी यापूर्वी पालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदी आणि विविध समित्यांवर काम केले असून, त्यांच्या पत्नी मोनिका मोहोळ याही काही काळ नगरसेविका होत्या. 2017साली झालेल्या निवडणुकीनुसार भाजपला निर्विवाद बहुमतानुसार 97 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, मनसे 2 आणि इतर 5 अशी नगरसेवक संख्या महापालिकेत असल्याने मोहोळ यांची निवड निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या निवडीमुळे अनेक वर्षांनी कोथरूड भागातली व्यक्ती महापौर असणार आहे. सौम्य, मितभाषी आणि चाणाक्ष असलेल्या मोहोळ यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने सभागृह चालवण्यास अडचण येणार नाही असेही मत जाणकार व्यक्त करत आहेत.
चंद्रकांत पाटील यांना दिली साथ; मुरलीधर मोहोळ यांना गवसली महापौरपदाची वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 10:57 AM