किरण शिंदे
पुणे : गजानन मारणे.. पुण्यातील नामचीन गुंड.. मारणे गँगचा म्होरक्या अशी त्याची ओळख.. गंभीर स्वरूपाच्या 24 गुन्ह्याची नोंद त्याच्या नावावर आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे, अपहरण करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात तो तुरुंगातही जाऊन आलाय. तर कोथरूड परिसरात राहणारा आणि अधून मधून चर्चेत येणारा हा गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आणि या वेळेस तो चर्चेत येण्याचे कारण ठरले भाजप नेते चंद्रकांत पाटील.
मंगळवारी गोकुळाष्टमी पार पडली. यांनिमित्ताने राज्यभरात दहीहंडी फुटल्या तशाच त्या पुण्यातही फुटल्या. भाजपचे नेते आणि सध्या कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातही दहीहंडी होती. आणि यातील एक दहीहंडी होती ती गुंड गजानन मारणेची. आणि या दहीहंडीला हजेरी लावली चक्क चंद्रकांत पाटलांनी. बर इतक्यावरच हे थांबलं नाही तर त्यांनी या गजानन मारणेच्या हस्ते सत्कार स्वीकारला. गजानन मारणे याने शॉल, पुष्पगुच्छ दिला चंद्रकांत पाटलांनी तो स्वीकारला. फोटोसाठी छान अशी पोजही दिली. आणि शेवटी या दोघांनी एकमेकांना हातही जोडले.
खरंतर गजानन मारणे गुंड आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जेव्हा पुण्यात पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी पुण्यातील सर्वच गुंडांची त्यांनी परेड काढली होती. त्यात अग्रभागी गजानन मारणे होता. त्यावेळी तो पोलिसांसमोर हात जोडून उभा होता. आणि त्याच गुंडासमोर आता भाजपचे प्रभावी नेते असलेल्या चंद्रकांत पाटलांनी हात जोडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. खर तर याआधी अनेक राजकारणी गजानन मारणेच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेले होते. यामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांचा समावेश आहे. त्यावेळी या भेटीची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर अजित पवारांनी तर गुंडगिरीला कोणीही बढावा देऊ नये असे सांगितलं होतं. तर निलेश लंके यांनी गजानन मारणे कोण आहे हे आपल्याला माहीतच नव्हतं असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र आता पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील गजानन मारणेसमोर हात जोडून उभे असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.. अवघ्या काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा कोथरूड मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यापूर्वीच या दोघांच्या भेटीचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत सापडले आहे.