चंद्रकांत पाटलांना कदाचित केंद्रात मंत्री करणार असतील; अजित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:52 PM2021-09-17T17:52:16+5:302021-09-17T17:52:23+5:30
एका कार्यक्रमामध्ये 'मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या तीन-चार दिवसांत काय ते तुम्हाला दिसून येईल,' असे वक्तव्य पाटलांनी केले होते.
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केंद्रामध्ये मंत्री करणार असतील तर मला माहीत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये 'मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या तीन-चार दिवसांत काय ते तुम्हाला दिसून येईल,' असे वक्तव्य केले होते.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लढविले जात आहेत. या संदर्भात पवार यांना विचारले असता ते म्हणाले, 'मी माझ्या कामावर लक्ष देतो. चंद्रकांत पाटलांना केंद्रात मंत्री करणार असतील तर पंतप्रधान मोदींना माहीत असेल. मी विकासकामांना प्राधान्य देतो. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत आहे. राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ही परिस्थिती सांभाळून राज्यात विकासकामांकडे लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी आम्ही सकाळपासूनच कामाला लागतो.
मराठा सेवा संघाला काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका मासिकातील लेखामधून भाजपशी युती करण्याचे सूतोवाच केले आहे. या संदर्भात पवार म्हणाले, 'काही संघटना राजकारणविरहित विशिष्ट उद्देशाने काम करीत असतात. अनेकांना वाटते की आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाशी तरी युती करावी. त्यांना काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील.
सिंहगड परिसर विकास आराखडा तयार
सिंहगड परिसराचा विकास आराखडा तयार आहे. खालील भागात किल्ल्याला शोभेल असे बांधकाम करून पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची लक्षणीय असल्याने तेथे वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय अन्य काही सोयी सुविधा उभारण्यात येणार असून त्यासाठी १० एकर जमिनीचा वापर करण्यात येईल. दरम्यान, सिंहगड परिसरात आता टपऱ्या उभारून देण्यात येणार नाही. सुटसुटीत दुकानांची निर्मिती करून किल्ल्यावरील पर्यटनाला शिस्त लावणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
प्रायोगिक तत्वावर ई वेहिकल सुरू
पीएमपीएमएलच्या प्रायोगिक तत्वावर ई वेहिकल सुरू करणार आहे. सद्यस्थितीत ३५ - ४५ ई बस तयार आहेत. पायथ्यापासूनवर जाण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल. त्यासाठी तिकीटही आकारले जाणार असून स्थानिक तरूणांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात येणार असून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.