पुणे - देशभरात गणेशोत्सवाची धूम असून विशेषत: महाराष्ट्रातून सुरुवात झालेल्या या उत्सवात यंदा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या २ वर्षानंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असून सर्वच जण मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते गल्ली-बोळातील बाल-गोपाळांपर्यंत गणपतीच्या आगमनाची, मंडळांच्या गणरायाची लगबग पाहायला मिळत आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही पुण्यातील मानाच्या गणपतीस्थळी सहभागी होत बाप्पांचे दर्शन घेतले. मात्र, ट्रॅफिकमुळे त्यांची गोची झाल्याचं दिसून आलं.
पुण्यातील रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून चंद्रकांत पाटील यांनी एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला. मात्र, दुचाकी वाहनावरुन विना हेल्मेट प्रवास केल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियातून टिका होऊ लागली. त्यानंतर, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत, यापुढे विना हेल्मेट प्रवास करणार नसल्याची कबुलीही दिली.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतलं. त्यानंतर भाऊ रंगारी गणपतीच्या प्रतिष्ठापणेसाठी ते जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता त्यांना वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मोटरसायकलवर बसून प्रवास केला. मंत्री महोदयांनी एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मोटरसायकलवर मागे बसून पुण्यातील गणपतींचं दर्शन घेणं पसंत केलं. विशेष म्हणजे भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या रथामध्ये देखील चंद्रकांत पाटील बसले होते. एकूणच यंदाच्या गणेशोत्सवात आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचाही सहभाग मोठ्या जल्लोषात दिसून आला.
उत्कृष्ट गणेश मंडळास ५ लाखांचा पुरस्कार
गणेशोत्सवावरील निर्बंध हटवून शिंदे-फडणवीस सरकारनं लोकांना आनंदात, जल्लोषात आणि काळजीपूर्वक सण साजरा करण्याचं आवाहन केले आहे. त्यानंतर आता राज्य शासनाने ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात आला आहे. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.