पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या नावाने कोथरूड (kothrud) परिसरात बॅनर लागले आहेत. या बॅनरवर, ' पुणे शहरातील कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून गेले आहेत. कुणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा' अशा स्वरूपाचा आशय लिहला आहे. या बॅनरमुळे शहरात विविध चर्चांना उधान आले आहे.
तर दुसऱ्या एका फ्लेक्सवर, दादा परत या असं लिहलं आहे. त्यानंतर त्यामध्ये, ' दादा एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाहीये. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पाहतोय!' असं लिहण्यात आले आहे. त्याखाली समस्त कोथरूडकरांची विनंती असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील काही नागरिकांनी चंद्रकांत पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात फिरकले नाहीयेत, असा आरोप केला आहे. त्यामुळे कोथरूड परिसरात 'दादा परत या' अशा स्वरूपाचे फ्लेक्स लागल्याचे दिसत आहेत.
यापूर्वीही पुण्यातील भाजप नेते धीरज घाटे यांच्या नावानेही बॅनर लागले होते. त्यामध्ये, 'नको बापट, नको टिळक पुण्याला हवी आता नवी ओळख' असं लिहलेलं होतं. त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळे फ्लेक्स लागले होते. आता कोथरूडमधील चंद्रकांत पाटलांच्या नावाने लागलेल्या या बॅनरमुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.