पुणे : सिंहगड रस्त्यावरील सुरू असलेल्या उड्डाणपुलाबाबत असलेली मागणी अवाजवी आहे. त्या पूर्ण केल्यास अतिरिक्त वर्ष लागेल. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढेल. पर्यायाने गोंधळ आणि अपघाताचा धोकाही वाढेल. तरीही आमदार भीमराव तापकीर व माधुरी मिसाळ यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारी तसेच तज्ज्ञ पाहणी करून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. यावरून या पुलाबाबत तांत्रिक अडचण पुढे करत त्यात बदल करण्यास पाटील यांनी नकारच दर्शवला.
याबाबत गुरुवारी पाटील यांनी विधानभवनात एक बैठक घेतली. त्यावेळी आमदार भीमराव तापकीर, महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, “तापकीर यांच्या आग्रहानुसार वडगाव येथे पुलावरून एक मार्ग उजव्या दिशेला काढावा लागत आहे. मात्र, असा मार्ग काढल्यास पुलाची उंची वाढवावी लागेल. त्यासाठी पुन्हा पुलाचे डिझाइन बदलावे लागेल. यात एक वर्ष जाईल. त्यासाठी पुन्हा परवानगी घ्यावी लागेल. मी यात एक पर्याय सुचविला. मार्ग काढता येत नसल्यास पादचाऱ्यांसाठी मार्ग करावा. मात्र, महापालिका प्रशासन त्यास तयार नाही. असे केल्यास नागरिक रस्त्यावर येतील. त्यातून अपघाताचा धोका आहे. त्यामुळे हेही शक्य नाही.”
हा उड्डाण पूल पुढे कालव्यापर्यंत आणावा, अशी तापकीर यांची मागणी आहे. महापालिका प्रशासन व तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कालव्याचा स्लॅब हा भार सहन करू शकणार नाही. पूल तिथपर्यंत आणल्यास तो स्लॅब बदलावा लागेल. तो मजबूत करावा लागेल. त्यासाठी जलसंपदा विभागाची परवानगी द्यावी लागेल. त्यातही वर्षदीड वर्ष जाईल. त्यामुळे ही मागणी अवाजवी आहे. मात्र दोन्ही आमदारांना सोबत घेऊन पाहणी केली जाईल. त्यांना समजावून सांगितले जाईल, असेही पाटील म्हणाले.
मिसाळांना निमंत्रणच नाही
सिंहगड उड्डाणपुलाबाबत गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. त्याला खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर उपस्थित होेते. मात्र, आमदार माधुरी मिसाळ यांना निमंत्रणच नसल्याचे समोर आले आहे. गेल्या वेळी झालेल्या बैठकीत मिसाळ व तापकीर यांच्यात वाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचे कळते.