पुणे : बाबरी मशीद पाडण्यात विश्व हिंदू परिषद, कार सेवक, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात शिवसेनेचे कार्यकर्तेही असतील; पण बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर आज जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर विश्वास कसा ठेवायचा. कारण त्याला खुप वर्ष झाली असल्याचे जयंत पाटलांनी सांगितले होते. त्यावर चंद्रकांत पाटलांनी पुन्हा निशाणा साधत उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोण जयंत पाटील ज्यांनी रामाचं नाव घेतल्यानंतर पाल पडल्यासारखं केलं ते आम्हाला रामा बद्दल काय शिकवणार. जयंत पाटील हिंदूत्वावर काय बोलतात या पेक्षा उद्धव ठाकरे काय बोलतात याची मी काळजी केली पाहिजे. मी उद्धव ठाकरे यांना फोन करून विचारेन उद्धवजी मी बाळासाहेब यांच्या विषयी असं बोलेन का, पण जयंत पाटील काय बोलले यावर मी कशाला बोलेन.
..तर महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये
सर्वाेच्च न्यायालयाला ९ मेपासून दीड महिन्याच्या सुट्ट्या लागत आहेत. त्यापूर्वी महापालिका निवडणुकीबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यास नियमानुसार पावसाळ्यात निवडणुका होऊ शकत नाही. त्या दरम्यान प्रभागरचना त्यावर हरकती आणि सूचना प्रक्रिया होईल. त्यावरून साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.