पुणे : फ्लेक्स लावले, फटाके फोडले तर मी कार्यक्रमाला येणार नाही, असे सांगतो. तरीही कार्यकर्ते फ्लेक्स लावतात. महापालिकेने असे अनधिकृत फ्लेक्स माझा फोटो असला तरी काढून तो जाळून टाकावा. फ्लेक्स काढणे, पदपथावरील अतिक्रमण काढणे ही क्षेत्रीय कार्यालयांची प्रमुख जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांनी अधिकृत ठिकाणीच फ्लेक्स लावावेत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त, परिमंडळाचे उपायुक्तांच्या बैठकीत ते बाेलत हाेते.
टेकड्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पालिकेचीच :
शहरातील टेकड्यांवर अतिक्रमण, खोदकाम सुरू असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, टेकड्यांची सुरक्षा करणे ही महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आमच्या पक्षाचा नेता, आमदार, मंत्री असला तरीही त्याचे अतिक्रमण पाडले पाहिजे. टेकड्यांवर अतिक्रमण झाले असेल तर अधिकाऱ्यांनी मदत मागवून घेऊन कारवाई करावे, असे आदेश दिले आहेत.
बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही :
बाबरी मशीद पाडण्यात विश्व हिंदू परिषद, कार सेवक, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात शिवसेनेचे कार्यकर्तेही असतील; पण बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
..तर महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये :
सर्वाेच्च न्यायालयाला ९ मेपासून दीड महिन्याच्या सुट्ट्या लागत आहेत. त्यापूर्वी महापालिका निवडणुकीबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यास नियमानुसार पावसाळ्यात निवडणुका होऊ शकत नाही. त्या दरम्यान प्रभागरचना त्यावर हरकती आणि सूचना प्रक्रिया होईल. त्यावरून साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.