पुणे: ‘भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणतात आघाडीत वाद आहेत, पण त्यांचे तरी कुठे चांगले चालले आहे?. त्यांच्यातही बराच गोंधळ आहे, त्यांच्यातील महाभारत तुम्हाला माहिती नाही अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडीत वाद असल्याचे आरोप खोडून काढले. संजय राऊत यांचे फार मनावर घेऊ नका, आम्ही लवकरच जागा जाहीर करू, प्रत्येकी ८५ जागा ठरले आहे, ते बरोबर आहे असे ते म्हणाले.
स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी म्हणून पटोले पुण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी महायुतीवर टीका केली. कोथरूडमधील युतीचे भाजपचे उमेदवार चंद्रकात पाटील यांनी आघाडीत वाद आहेत असे वक्तव्य केले होते. त्याकडे लक्ष वेधले असता पटोले यांनी युतीवर टीकेचा भडिमारच केला. ते म्हणाले, आमच्यात वाद आहे म्हणता तर तुमचे तरी कुठे चांगले चालले आहे. तुमच्यात तर महाभारत सुरू आहे. त्यांनाही अनेक जागा जाहीर करता आलेल्या नाहीत. सरकारच्या माध्यमातून त्यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारला, आता ते मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही.
आघाडीच्या जागा अजून जाहीर झालेल्या नाहीत असे विचारले असता पटोले यांनी त्यांच्यातरी कुठे जाहीर झाल्या आहेत? असा प्रतिप्रश्न केला. आघाडी आहे, मतभेद असतातच, ते आम्ही मिटवत आणले आहेत. आमची यादी मी मुंबईत गेल्यावर लगेचच सादर करणार आहे. अन्य मित्रपक्षांचीही यादी लवकरच जाहीर होईल. त्यांनाही काही जागा जाहीर करता आलेल्या नाहीत. त्यांचा तर सगळा कारभारच दिल्लीहून चालतो. शिवसेनेचे संजय राऊत काही बोलत असतात, त्यांचे तुम्ही फार मनावर घेऊ नका असा सल्लाही पटोले यांनी पत्रकारांना हसतहसत दिला.
मुख्यमंत्री पदाबाबत आम्ही नंतर काय ते ठरवू. आमच्यासमोर आत्ता महाराष्ट्र वाचवण्याचा विषय आहे. त्यांनी आमचा मुख्यमंत्री शपथ घेणार असे सांगतात, पण ते तरी मुख्यमंत्रीपदाचे नाव कुठे जाहीर करतात असे पटोले म्हणाले. राज ठाकरे यांचा पक्ष किंवा राज ठाकरे यांच्याबाबत आम्ही आतापर्यंत काही बोललो नाही व त्यासंबधीच्या प्रश्नावर उत्तरही देणार नाही असे त्यांनी सांगितले.