पुणे: राज्यातील कोरोना वाढतो आहे, सरकारने ते गांभीर्याने घ्यायला हवे, मुख्यमंत्री अयोध्येला जाणार असतील तर जा, पण मग त्यांच्याशिवाय जे कोणी प्रमुख आहेत त्यांनी हा विषय गंभीरपणे घ्यावा असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा प्रकार सगळ्यांनीच थांबवावा, त्याची सुरूवात चंद्रकांत पाटील यांनी स्वत:पासूनच करावी असा टोलाही त्यांनी मारला.
बारामती होस्टेलमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केले. कोरोनाची सुरूवात पुण्यातून झाली होती, त्यानंतर तो वाढला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, आता ते दिसत नाहीत, यांच्यात चर्चा व्हायची. आताही तसे होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
वादग्रस्त वक्तव्ये करूच नये, घटनेने दिलेल्या अधिकारातच बोलावे असे पवार यांनी फडतूस, काडतूस यावर बोलताना सांगितले. बालभारती पौड रस्त्याबाबत बोलताना त्यांनी भविष्याचा विचार करून असे प्रकल्प करावेत असे मत व्यक्त केले. वसुंधरेला धक्का लागणार नाही, पुढच्या पिढीला आपण काही ठेवतो आहोत किंवा नाही याचा विचार केला जावा, पुण्यातील वाहतूक सुसह्य करण्यासाठी जे काही करता येण्यासारखे आहे ते करायला हवे, स्थानिक नागरिकांनीही यात आपली काही जबाबदारी आहे हे लक्षात घ्यायला हवे.
महाविकास आघाडीची सभा होईल तिथे हनुमान चालिसा म्हणणार या खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, म्हणू द्या की त्यांना. त्यामुळे त्यांचे समाधान होणार असेल तर त्यांना आडकाठी कशासाठी करायची? सत्ताधाऱ्यांना आम्ही काही सांगायला गेलो की ते आम्हालाच सांगतात, तुमच्या काळातही तसेच होत होते. म्हणजे आम्ही चूक केली तर तुम्हीही करणार का? मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांच्या हातात सत्ता आहे, त्यामुळे करतात, पण जनता हे पहात असते. विचार करते. ज्यावेळेस ते मतदानाला जातील त्यावेळी दाखवतील.“