मुंबई - राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमध्ये घुसमट सुरू आहे. ते केवळ सहीपुरतेच उरले आहेत. नगरविकास खात्याचा कारभार मातोश्रीवरूनच चालतो. त्यामुळे शिंदे हे वेगळा मार्ग शोधण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपमध्ये यावे, असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल केलं. राणेंच्या या दाव्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे नकार दिला. तसेच, माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी, असेही शिंदेंनी म्हटलं. आता, याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त केलंय.
नारायण राणें हे नव्याने भाजपात आले असले तरी त्यांचा राजकीय, सामाजिक जीवनातील अनुभव दांडगा आहे. त्यामुळे, त्यांच्याइतकं निरीक्षण आणि अनुमान काढणं हे आम्हा कोणालाच जमणार नाही, असे चंद्रकांत पाटील यानी म्हटलं आहे. तसेच, ज्या शिवसेनेबद्दल ते बोलतात, त्या शिवसेनेतून त्यांचा उदय झाला. त्यामुळे, त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत. लहानपणापासून वाढताना पाहिलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेही माहिती आहेत, त्यांचे कुटुंबीय माहित आहेत. त्यामुळे, त्यांची छातीठोकपणे अनुमान असतात, ते परखडपणे मांडतात, ही त्यांची स्टाईल आहे, असेही पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदेंबद्दल नारायण राणेंनी मत मांडलंय, त्यावर शिंदेंनीही ही वस्तुस्थिती नसल्याचं म्हटलंय. मात्र, याबद्दल मला माहिती नाही, पण ही केवळ एकनाथ शिंदेंची वस्तुस्थिती नसून अनेकांची आहे. सरकारच्या मंत्रीमंडळातील तामझाम आहे, त्यामुळे अनेकजण मंत्रीमंडळात आहेत, असेही पाटील यांनी म्हटलं. तसेच, राणे यांनी माहिती माझ्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही, असे म्हणत पाटील यांनी आपलं मतही मांडलं.
काय म्हणाले एकनाथ शिंदे
मला कामाचं स्वातंत्र्य नाही. माझ्या विभागाचा कारभार मातोश्रीवरून चालतो, हा शोध नारायण राणेंनी कुठून लावला ते माहीत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 'मला माझ्या विभागात काम करताना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अनेक प्रलंबित प्रश्न मी मंत्री म्हणून मार्गी लावले आहेत. बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाचं काम आम्ही पुढे नेत आहोत,' असंही शिंदे पुढे म्हणाले. मी पक्षात समाधानी आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या दाव्यात, त्यांच्या विधानात कोणतंही तथ्य नाही. त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. मातोश्रीकडून माझ्या कामात कोणताही हस्तक्षेप होत नाही. मला स्वातंत्र्य नसतं, तर मी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलोच नसतो, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.
नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असून शनिवारी त्यांनी वसई- विरार शहराचा दौरा केला. गोमूत्र शिंपडण्याचे उद्योग करण्यापेक्षा रोजगार देण्याचे व्यवसाय करा, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला केला. भरपावसात काढलेल्या या यात्रेला मोठी गर्दी जमली होती. यात्रेदरम्यान त्यांनी वसईतील उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. जेवढी कामे मी केली आहेत, त्यापेक्षा एक दशांश कामेही उद्धव ठाकरे यांनी केलेली नसल्याचं ते म्हणाले.