पुणे : विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपने पाटील यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली आहे. त्यामुळे कुलकर्णी यांच्यासह इच्छुकांचाही हिरमोड झाला असताना पाटील यांनी मात्र 'मी कोथरुड मतदारसंघ मागायला गेलो नव्हतो, उलट नको नको म्हणत होतो' असे वक्तव्य केले आहे. मात्र एकदा लढायचं ठरलं तर हार पत्करणे मला माहिती नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
कोथरूड मतदारसंघाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे यांच्यासह विविध नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, 'मेधा कुलकर्णी यांना वाईट वाटणं साहजिक आहे. ती जिवंत माणसाची निशाणी आहे. त्यांनी मतदारसंघासाठी काम केले आहे. मुरलीधर मोहोळ यांनीही खूप तयारी केली होती.मात्र मी कोथरूड मागायला गेलो नव्हतो, दिल्यावर नको-नको म्हणत होतो. मात्र ज्या पद्धतीने माझे चौकाचौकात स्वागत झाले ते बघता आमच्या पक्षातील भांडणे कुटुंबातील आहेत हे लक्षात येईल. इतकेच नव्हे तर हे पेल्यातील वादळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधकांवर बोलताना ते म्हणाले की, 'मागील पाच वर्षात विरोधकांनी खूपदा गणपती पाण्यात ठेवले. मात्रा आता त्यांना लक्षात आले असेल की, ते त्यांना लाभत नाही. पक्षाने कार्यकर्ता म्हणून जगण्यास शिकवले, आमचा पक्ष कुटुंबासारखा आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी पुण्याचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यांच्यापूर्वी बापट, काकडे, कुलकर्णी आदींची भाषणे झाली.