पुणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याच दरम्यान देशमुख यांनी आरोपांची चौकशी होईपर्यंत पदावर राहणे योग्य नाही असे म्हणत आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आता सीबीआयकडून आज ( दि. २४) देशमुख यांच्या नागपूरमधील येथील निवासस्थानी छापा कारवाई केली आहे.
या कारवाईनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी '' काही जण सुपात तर काही जण जात्यात असल्याची प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसेच काही काळजी करु नका, परमेश्वर सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करतो अशा शब्दात मार्मिक टिपण्णी देखील केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. पाटील म्हणाले, अनिल देशमुखांच्या घरावरील सीबीआयचा छापा ही कायदेशीर बाब आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. तसेच सिंह यांच्या आरोपांवरुन अनिल देखमुखांविरोधात सीबीआय चौकशी केली जाते तर वाझेने ऑन पेपर अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. परब यांनी देखील मुंबई महापालिकेच्या नावाचा वापर करून अनेकांना धमकावत पैसे घेतल्याचे वाझेने सांगितले आहे. त्यांचीही चौकशी झालीच पाहिजे असेही पाटील यावेळी म्हणाले. आहे.
हसन मुश्रीफ यांचं ही कारवाई भाजपाचा कट असल्याचं म्हणणं हास्यास्पद
अनिल देशमुखांच्या नागपूर येथील घरी सीबीआयने छापा कारवाई केल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सीबीआयच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारला लक्ष्य केले होते.तसेच देशमुखांवरील कारवाई भाजपचा कट असल्याचे मत ठाकरे सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले होते. मात्र त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना पाटील यांनी मुश्रीफ यांचे मत हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे .
सत्तेचा दुरुपयोग करून आघाडी सरकारला बदनाम केलं जातंय.. मलिकांचा आरोप
सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "सीबीआयला संशय असेल तर चौकशी किंवा धाडी टाकू शकतात शिवाय गुन्हा दाखल करु शकते. परंतु पहिल्या दिवसापासून ज्यापद्धतीने हे प्रकरण तयार करण्यात आले आहे यावरुन हे राजकारणच सुरू असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला
काय आहे प्रकरण...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप केला होता. या प्रकरणी सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने नंतर अनिल देशमुख व संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.