'दादा तुमच्याच मंत्रिपदाचं काही नक्की नाही', अजितदादांचे वक्तव्य चर्चेत; पुण्याचा पालकमंत्री कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:50 PM2022-07-05T14:50:05+5:302022-07-05T14:50:18+5:30
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण आले आहे
राजू इनामदार
पुणे : विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण आले आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद काेणाला मिळणार, असा प्रश्नही उपस्थित हाेत आहे. आता पालकमंत्रिपदाची माळ आमदार माधुरी मिसाळ यांच्या गळ्यात पडेल का, अशीही चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर रविवारी विधानसभेत झालेल्या भाषणात अजित पवार यांनी मनसोक्त टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह खुद्द विधानसभा अध्यक्षही त्यातून सुटले नाहीत. त्यातच अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. ‘दादा, तुम्ही फार बाकडे वाजवू नका, तुमच्याच मंत्रिपदाबाबत अजून नक्की काही नाही,’ असे ते म्हणाले. तसे असेल तर पुण्याचा पालकमंत्री कोण? असा प्रश्न चर्चेत आला आहे.
मागील अडीच वर्षे पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडेच होते. ते स्वत:च पुणे जिल्ह्याचे असल्याने पुणे शहरासह जिल्ह्याकडे त्यांचे बारीक लक्ष होते. त्याआधी भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात बहुतांश काळ पुण्याचे पालकमंत्रिपद गिरीश बापट यांच्याकडे होते. ते खासदार झाल्यानंतर अखेरचे काही महिने चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री झाले. त्यानंतर ते कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडूनही आले. आता ते पुण्यातीलच आमदार असल्याने त्यांच्याकडेच पुण्याचे पालकमंत्रिपद असणार, अशी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना खात्रीच आहे.
अल्पावधीतच पाटील यांनी पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह आपला स्वतंत्र असा गट तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी पूर्वी पुण्यात एकहाती वर्चस्व असलेले खासदार गिरीश बापट यांच्याशीही वाकडे घेतले आहे. बापट व पाटील कधीही एकत्र दिसत नाहीत. असलेच तर एकमेकांवर शाब्दिक शरसंधान केल्याशिवाय राहत नाहीत. खासदार असूनही बापट यांना शह देण्यात पाटील यशस्वी झाले आहेत. तरीही बापट यांचे काही कट्टर समर्थक आजही पुण्यात आहेत. त्यांच्या मते पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. शिवसेनेतील बंडखोरीमुळे भाजपसमोर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचे आव्हान आहे. त्यामुळे संघटन कौशल्य असलेल्या पाटील यांना भाजपचे केंद्रातील वरिष्ठ मंत्रिपदात अडकवून ठेवणार नाही, असे बापट समर्थकांचे म्हणणे आहे. काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय उगीचच अजित पवार बोलणार नाहीत, असेही त्यांना वाटते.
दरम्यान, तसे झालेच तर पुण्यातून सध्या तरी आमदार माधुरी मिसाळ यांच्याशिवाय दुसरे कोणीही वरिष्ठ नाही. खडकवासला विधानसभा मतदारसंघात भीमराव तापकीर ज्येष्ठ आहेत, तेही मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना थांबायला लावून भाजपने चंद्रकात पाटील यांना तिथून निवडून आणले. एका सुशिक्षित महिलेवर भाजपने अन्याय केला, असे आजही पुण्यात बोलले जाते. तो ठपका धुवून काढायचा तर मग आमदार मिसाळ यांच्या गळ्यात पुण्याच्या पालकमंत्रिपदाची माळ पडू शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.