पुणे: आज राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये पुणे जिल्ह्याला कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रुपात मंत्रिपद मिळाले. मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या जिल्ह्यातील इतर नेत्यांच्या नावाला आता पूर्णविराम मिळाला आहे. चंद्रकात पाटील यांच्यासोबत जिल्ह्यात अजून एक मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा सुरू होती. पण आजच्या मंत्रिमंडळात या सर्व चर्चा थांबल्या. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून मेधा कुलकर्णी या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण २०१९ मध्ये पक्षाने कुलकर्णी यांचे तिकीट कापून त्याठिकाणी चंद्रकांत पाटील यांना लढविले होते. पाटील सध्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार आहेत.
गेल्या महिनाभरापासून राज्यभरात या विस्ताराची वाट पाहिली जात. रखडलेल्या मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून विरोधकांनीही राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले होते. दौंडचे आमदार राहुल कूल, पर्वती मंतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या माधूरी मिसाळदेखील मंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या. पण मिसाळ यांची पुण्यातून पहिल्या महिला मंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता मावळली.
चंद्रकांत पाटील यांचा अल्प परिचय-
चंद्रकांत पाटील ( १० जून १९५९) हे जुलै २०१६ पासून ते ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री होते. ते जुलै २०१९ पासून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील बच्चू पाटील हे मिल कामगार होते. मुंबईमधील प्रभुदास चाळीमध्ये त्यांचे लहानपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील दादर येथील राजा शिवाजी विद्यालय म्हणजेच किंग जॉर्ज शाळेत झाले. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून १९८५ साली त्यांनी पदवी प्राप्त केली.
विद्यार्थी परिषदेतील संघटनात्मक बांधणीचे त्यांच्यातील गुणवैशिष्ट्य हेरून भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांनी त्यांना पक्षाचे काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार, राजकीय जीवनात प्रवेश करून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. सन २००४ मध्ये त्यांनी प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाली. सन २००९ मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली. या निवडणुकीत शरद पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विधान परिषदेत प्रवेश केला.
सन २०१३ रोजी त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर २०१४ मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय संपादन करत, विधान परिषदेत पुन्हा प्रवेश केला. सन २०१४ च्या विधान सभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत, सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम आदी विभागाची सूत्रे सोपवण्यात आली.
२०१६ पासून ते महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री आहेत. तसेच राज्याचे दिवंगत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे कृषी खात्याचा कार्यभार सोपवला होता. जुलै २०१९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाली.