धायरी: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली.
चाकणकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करुन चंद्रकांत पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे. चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणघेणं नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा M.Phil करत आहेत. छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, चंद्रकांतदादांनी आपल्या आजुबाजूला पाहिले तर भाजपमधील अनेक नेतेही जामिनावरच बाहेर आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार , चिक्की घोटाळा , मुंबई बँक घोटाळा ते पीडब्लूडी अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्या चौकशी होईल, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.