पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. आणि दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन वर्षपूर्ती झाली आहे. याच योग योगाचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी इंदापूर येथे एका कार्यक्रमात अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या कोरोना लसीचे उत्पादन पुण्यात होत असून ते पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत, यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार ? असे कौतुकोद्गार काढत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, महात्मा फुले यांना भारतरत्न देण्यात यावा अशी आमची पहिल्यापासून जाहीर भूमिका राहिली आहे. फुले यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची केले. पण अद्यापही ते त्यांचं कार्य पूर्णत्वास गेलेले नाही. ठाकरे सरकारकडून गेल्या वर्षभरात त्याविषयी काहीच काम करण्यात आले नाही. ते काम व्हावं हीच फुले दांपत्याला खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे.
याचवेळी पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिप्पण्णीवर ''त्या स्वप्नात आहेत का ? '' असे एकाच वाक्यात प्रत्युत्तर दिले आहे.
पुढे पाटील म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. मराठा आरक्षण असो वा अतिवृष्टी यांसारख्या कुठल्याही प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही. आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा एकमेकांवर कुरघोडी करण्यातच जास्त वेळ खर्च होतो आहे. तीन पक्षात कोणताही समन्वय नाही.
संजय राऊतांना कोपरखळीशिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारख्या सर्व सामान्य माणसाने काय बोलावे अशी जोरदार कोपरखळी मारली आहे.