पुणे : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना मुंबईतील मनाली हाॅटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले हाेते. पाेलीस त्यांना विमानाने उत्तरप्रदेशला पाठविणार अशी चर्चा सुरु असताना आता आझाद पुण्याकडे येत आहेत. दरम्यान पुण्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माेठा पाेलीस बंदाेबस्त आझाद ज्या ठिकाणी सभा घेणार हाेते तेथे आणि ते ज्या हाॅटेलमध्ये उतरणार आहेत तेथे तैनात करण्यात आला आहे.
चंद्रशेखर आझाद हे मुंबईतील वरळीमध्ये सभा घेणार हाेते. परंतु पाेलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. तसेच ते ज्या हाॅटेलमध्ये थांबले हाेते, त्या हाॅटेलच्या पाचशे मीटर अंतरावर जमावबंदी लागू करण्यात आली हाेती. सरकारने आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचा आराेप आझाद यांनी केला हाेता. आज संध्याकाळी पुण्यातील एस एस पी एम एस च्या मैदानावर त्यांची सभा हाेणार हाेती, त्याची तयारी सुद्धा करण्यात आली हाेती. परंतु पाेलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्याने त्यांची सभा रद्द करण्यात आली. तसेच उद्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सभा घेणार हाेते. त्या सभेला देखील विद्यापीठाने परवानगी नाकारली आहे. आझाद यांना मुंबईतून उत्तरप्रदेशला पाठविण्यात येईल असे सांगितले जात हाेते. परंतु आझाद यांनी पुण्याला जाणारच असा निर्धार केला हाेता. त्याप्रमाणे आता ते पुण्याकडे येण्यास रवाना झाले आहेत.
दरम्यान आझाद यांची सभा हाेणार हाेती त्या एस एस पी एम एस मैदानावर पाेलिसांनी माेठा बंदाेबस्त तैनात केला आहे. त्याचबराेबर कॅम्प भागातील सागर पॅलेस या हाॅटेल बाहेर देखील पाेलीस तैनात करण्यात आले आहे. पुणे पाेलिसांनी आझाद यांना पुण्यात येण्यापासून अडवणार नाही परंतु त्यांना सभा घेण्यास परवानगी देणार नसल्याचे म्हंटले आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आझाद पुण्यात पाेहचण्याची शक्यता आहे.