पुणे : एटीएम मशीनमध्ये फेरफार करुन त्यातून पैसे काढून ते न मिळाल्याचे दर्शवून बँकेला गंडा घालण्याचा नवा प्रकार उजेडात आला आहे. अशा प्रकारे पैसे काढणाऱ्या दोघांना नागरिकांनी पकडून डेक्कन पोलिसांच्या हवाली केले आहे. अॅपचा वापर करुन बँकेला गंडा घातल्याचे काही प्रकार नुकतेच पुणे शहरात घडले आहेत. याशिवाय हरयाणा, मुंबई, हैद्राबादमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
देवकरण दीपचंद प्रजापती (वय 27) आणि सर्फराज उमर मोहंमद (वय 26, दोघे रा़ हरियाना) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्वे रोड शाखेचे व्यवस्थापक संजय नलावडे यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कर्वे रोडवरील पेट्रोल पंपावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रजापती व सर्फराज यांनी पैसे काढण्याच्या बहाण्याने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. त्यातील मशीनमध्ये काही फेरफार केले़ व त्यातून 60 हजार रुपये काढले़ यावेळी बाहेर थांबलेल्या एका नागरिकाला त्याचा संशय आला. त्यांनी इतरांना सांगितल्यावर सर्वांनी मिळून त्या दोघांना पकडून डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिले. डेक्कन पोलिसांनी दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असताना अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांना 30 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
असे करत होते फसवणूकप्रजापती आणि सर्फराज यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने हरियानामध्ये बँकेत खाते काढली आहेत. त्या खात्याच्या एटीएम कार्डद्वारे त्यांनी एटीएम सेंटरमधून पैसे काढले. त्यावेळी त्यांनी एका अॅपचा वापर केला जातो. त्यामुळे मशीन संदेश पुढे पाठवत नाही. पण एटीएममधून पैसे मात्र मिळतात. बँकेला पैसे दिल्याचा संदेश मिळत नसल्याने कार्डधारकाला पैसे मिळाले नसल्याचे दिसून येते. नंतर हे बँकेत जाऊन सांगतात. पैसे काढले तरी ते मिळाले नाही असा दावा करतात. ट्रॉन्झक्शन पूर्ण झाली नसल्याचे दिसत असल्याने बँकेकडून ते पैसे पुन्हा बँक खात्यात जमा होतात. त्यात बँकेला गंडा घातला जातो़ (याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून अधिक माहिती दिली नाही) तो चोरटा आणि बँक यांचा संबंध येत असल्याने इतरांना ते समजत नाही. एकाच वेळी प्रजापती आणि सर्फराज यांनी दोन तीन कार्ड वापरुन 60 हजार रुपये काढल्याने एका नागरिकाला संशय आला व त्यामुळे ते पकडले गेले. प्रजापती अणि मोहंमद यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे.