पुणे : लोकसभा निवडणुक रणधुमाळी जोरात सुरु असून महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यात ११ मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांबरोबरच अभिनेते, अभिनेत्री कलाकारही मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत. अभिनेत्री श्रुती मराठेने सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर त्यापाठोपाठ पुण्याच्या सिटी पोस्ट येथे अभिनेते सुबोध भावे यांनी मतदान केले आहे. तर निगडीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरीही मी आणि माझ्या घरातले सर्वजण मतदान करतो, कोणतेही मतदान आम्ही बुडवत नाही. तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा असं मी मतदारांना आवाहन करीन, कारण तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल’ असे सुबोध भावे याने सांगितले.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, काहीतरी आशेचे चिन्ह आपल्यासमोर आहे म्हणून आपण बाहेर पडतो. आजचा महत्वाचा असून तो वाया घालवू नका. ज्या अर्थाने आपण घरात बसून राजकारण, विकास, घडामोडी यावर चर्चा, भांडण करतो. त्यासाठी आपण मतदान करायला हवे. ते केल्यावरच त्याबाबत बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्यामुळे सर्वांनी आवर्जून या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क बाजवळ पाहिजे.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी ६.६१, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी ५.३८ तर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी ४.९७ टक्के मतदान झाले आहे अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र दिसत असून मतदार यादीत नाव वगळल्याच्या तक्रारी ही मतदारांकडून येत आहेत पहिल्या दोन तासात मतदान शांततेत पार पडल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.