पुणे : मुंबई वगळता अन्य महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय वाॅर्ड रचनेबाबत थोडे थांबा, बुधवारी होणा-या मंत्री मंडळाच्या बैठकीत तुम्हाला याबाबत पक्का निर्णय कळेल, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. यामुळेच पुन्हा एकदा महापालिका निवडणूकांसाठीची वॉर्ड रचना बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबई वगळता अन्य सर्व महापालिकांसाठी तीन सदस्यीय वाॅर्ड पध्दतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी पवार यांनी प्रदेश काँग्रेसने कार्यकरणीची बैठक घेऊन राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. महापालिका निवडणूकांसाठी दोन सदस्यांचा एकच प्रभाग करावा, अशी मागणी केली होती. तर दोन सदस्यांचा एक प्रभाग असावा, अशी भूमिका पहिल्या पासून राष्ट्रावादी कॉंग्रेसने घेतली आहे. असे असताना तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती.
कोरोनाची आढावा बैठक घेण्यासाठी आज पवार पुण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्ड रचनेसंदर्भात विचारले असता पवारांनी ‘थोडे थांबा’ असे सूचक वक्तव्य केल्याने राज्य सरकारने यापूर्वी घेतलेला निर्णय पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पवार म्हणाले,‘‘ काही वाद होणार नाही. आमच्या सहकारी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. ती त्यांनी त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडली आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून समंजसाने मार्ग काढू. येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा पक्की माहिती मिळेल. वॉडे रचनेबाबत कोणताही वाद होणार नाही. ज्यांना न्यायालयालयात जायचे ते जाऊ शकतात. निवडणूका आयोगाने जिल्हा परिरदेच्या निवडणूका पुढे ढकलण्यास नकार दिला आहे, त्यावर विचारले असता पवार म्हणाले,‘ निवडणूक आयोग त्यांचे काम करीत आहे. ती स्वयत्त संस्था आहे. त्यांना त्यांचा अधिकर आहे. त्यांचे ते भूमिका घेऊ शकतात.
मुळशी धरणातून पुण्यासाठी लवकरच निर्णय
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-बंगळुरू रस्त्यावर नवे पुणे विकसित करा अशी सूचना केली आहे. गडकरी यासाठी काहीसे अग्रही दिसत आहेत. पण सध्या वाढत्या पुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. भामा-आसखेड धरणातून पाणी घेऊन काही भागाचा प्रश्न मार्गी लावला आहे. टाटांच्या मुळशी धरणातून पाणी घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. या संदर्भातील एक अहवाल लवकरच शासनाकडे दाखल होणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. यामुळेच नवीन पुण्याचा विचार करताना सर्वात प्रथम पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे खूप आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.