सत्ताबदलाचा पुरंदरालाही फटका! राष्ट्रवादीच्या विरोधात रणशिंग फुंकणारे आता संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 02:18 PM2023-08-03T14:18:09+5:302023-08-03T14:18:45+5:30

भाजपचे इनकमिंग सुरूच असल्याने आमदारकीच्या उमेदवारीचे भाजपला गणित काही सुटेनासे झाले असल्याचे चित्र

Change of power also hit Purandara! Trumpeters against NCP are now confused | सत्ताबदलाचा पुरंदरालाही फटका! राष्ट्रवादीच्या विरोधात रणशिंग फुंकणारे आता संभ्रमात

सत्ताबदलाचा पुरंदरालाही फटका! राष्ट्रवादीच्या विरोधात रणशिंग फुंकणारे आता संभ्रमात

googlenewsNext

जेजुरी : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता अजित पवार गट सहभागी झाल्याने राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. सगळीकडेच त्याचा परिणाम झाला असला तरी सर्वाधिक प्रभाव पुरंदर विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. आधीच शिंदे गटाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भाजपच्या साथीने विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादीविरोधात रणशिंग फुंकले होते. त्यातच राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि त्यानंतर अजित पवार हे भाजप सरकारमध्ये दाखल झाल्याने मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. इनकमिंग सुरूच असल्याने आमदारकीच्या उमेदवारीचे भाजपला गणित काही सुटेनासे झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप-आरपीआय युतीतून सेनेचे विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीतून काँग्रेसचे संजय जगताप यांच्यात दुरंगी लढत झाली होती. त्यामध्ये संजय जगताप यांनी ३० हजारांहून अधिक मतांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुरंदर विधानसभा येत असल्याने बेरजेच्या राजकारणात नेहमीच राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली आहे. संजय जगताप यांनी येथील विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. किंबहुना त्यासाठी थेट रस्त्यावरदेखील उतरले आहेत. तसं म्हटलं तर आमदार जगताप यांनी आपली बाजू भक्कम केली आहे. दुसरीकडे भाजपने मिशन बारामतीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. 

पुरंदर तालुक्यात २०१९ पर्यंत भाजपची ताकद अगदी नगण्य होती. मतदारसंघातील हवेली तालुका वगळता पुरंदरमध्ये भाजप नावाला होती. त्यानंतर जनता दलाचे बाबा जाधवराव व्हाया मनसे भाजपमध्ये दाखल झाले, सोबत गंगाराम जगदाळेंना घेऊन आले. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून जालिंदर कामठे, राहुल शेवाळे यांनी ही भाजप जवळ केली. पुढे यथावकाश माजी आमदार अशोक टेकवडे त्यांचे चिरंजीव अजिंक्य टेकवडेंसह भाजपात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार हे देखील राष्ट्रवादीच्या ३२ आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत.

दुसरीकडे शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी आगामी निवडणुकीत उभे राहण्याची जोरदार तयारी सुरू केली होती. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी फुरसुंगी, उरुळी देवाची यांना स्वतंत्र नगरपरिषद केली. इतकेच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी आणि विद्यमान आमदारांविरोधात रणशिंग फुंकले होते. राष्ट्रवादीतील अनेक नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होताहेत आणि आता थेट अजित पवारच आल्याने शिवतारेंपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजपात माजी आ. अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, माजी जि. प. अध्यक्ष जालिंदर कामठे, भाजप तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे, राहुल शेवाळे यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहेच. तिकडे अजित पवार गटातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे मागे राहणार नाहीत. शिवतारेंना महायुतीच गणित जमणार नाही. विरोधात काँग्रेस आणि शरद पवार गट आघाडी झाली तर संजय जगतापांना अडचण नसेल. मात्र, नाहीच झाली तर मात्र शरद पवारांचे निष्ठावंत माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे उमेदवार असणार यात शंका नाही. याशिवाय माजी जि. प. अध्यक्ष विजय कोलते, माजी जि. प. सदस्य सुदाम इंगळे शर्यतीत असणार आहेतच. उद्धव ठाकरे गटाकडून माजी पंचायत समिती सभापती रमेश जाधव यांनीही तयारी चालवलेली आहेच. याशिवाय आप आणि मनसेकडून ऐनवेळी उमेदवार येणार आहेच. एकूणच इच्छुकांच्या गर्दीपुढे पुरंदरचे गणित काही सुटत नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.

सन २०१९ चे मतदान

संजय जगताप - १,३०,७१०
विजय शिवतारे - ९९,३०६

Web Title: Change of power also hit Purandara! Trumpeters against NCP are now confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.