पिंपरी : पैसे उकळण्याच्या उद्देशाने एकाने धर्म बदलून महिलेशी लग्न केले. त्यानंतर तिच्याशी अनैसर्गिक संबंध केले. तसेच तिचे दागिने घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २ फेब्रुवारी २०१७ ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत घडला. पीडित ३१ वर्षीय महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. २२) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुख्य आरोपी असलेला तिचा पती, सासरा, मोठा दीर, मामा, तसेच दोन महिला, असे सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी याने पैसे उकळण्याच्या व फसविण्याच्या उद्देशाने त्याचा धर्म सोडून फिर्यादी पीडित महिलेचा धर्म स्वीकारला. तसेच मुख्य आरोपीने त्याचे स्वत:चे नाव व आडनाव देखील बदलले व फिर्यादी महिलेशी लग्न केले. त्यानंतर वारंवार अनैसर्गिक संबंध ठेवून फिर्यादी महिलेवर अत्याचार केला. फिर्यादी महिलेच्या घरच्यांकडून वारंवार पैशांची मागणी करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२१ रोजी फिर्यादीचे दागिने घेऊन तो कुठेतरी निघून गेला. फिर्यादीचे दागिने व फिर्यादीच्या घरच्यांनी आधी दिलेल्या पैशांचा त्याने अपहार केला.
दरम्यान, फिर्यादी महिलेच्या पतीचा वडील, मोठा भाऊ, दोन महिला आरोपी तसेच फिर्यादीचा मामा यांनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.