पुणे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. १४) पुणे स्टेशन, लष्कर भागातील अरोरा टाॅवर, विश्रांतवाडी, दांडेकर पूल, दत्तवाडी भागात तात्पुरते वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येतात. गुरुवारी (दि. १४) सकाळी ६ वाजल्यापासून रात्री गर्दी ओसरेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल लागू राहणार आहेत. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. मुख्य टपाल कार्यालय (जीपीओ) ते बोल्हाई चाैक, नरपतगिरी चौक ते मालधक्का चौक, बॅनर्जी चौक ते शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.
लष्कर भागातील अरोरा टाॅवर चौक परिसरातील डाॅ. आंबेडकर पुतळा परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. विश्रांतवाडी चौक परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहे.
दांडेकर पूल परिसरात वाहतूक बदल
दांडेकर पूल चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महू येथील जन्म ठिकाणाची प्रतिकृतीचा देखावा केलेला आहे. सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सिंहगड रस्त्यावरील आशा हाॅटेल चौकातून सावरकर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सावरकर चौक, सारसबाग चौक, सणस पुतळा, कल्पना हाॅटेल चौक, ना.सी. फडके चौक, मांगीरबाबा चौक, सेनादत्त पोलीस चौकी, बालशिवाजी चौक, आशा हाॅटेल चौकमार्गे उजवीकडे वळून सिंहगड रस्त्याकडे जावे. सिंहगड रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आशा हाॅटेल चौक, दत्तवाडी, सेनादत्त पोलीस चौकी, मांगीरबाबा चौकातून इच्छितस्थळी जावे.