पुणे - प्रत्येक माणसाचे शरीर जर निरोगी, सदृढ राहायचे असेल तर जीवनशैलीमधे बदल करणे गरजेचे आहे. व्यायाम, आहार याकडे लक्ष दिले पाहीजे. हल्ली जन्मजातच काही रोग होतात. भारतामध्ये सर्वांत जास्त मधुमेहग्रस्त नागरिक असणे, ही खुपच चिंताजनक बाब आहे. प्रत्येकाने आपापल्या शरीराची काळजी घेवून भारत सदृढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी व्यक्त केले.
ह्दयमित्र प्रतिष्ठान आयोजित डॉ. सुहास पांडे लिखित ‘मधुमेह स्त्रिया व ह्दयविकार’ या पुस्तकाचे प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी डॉ.वनिता जगताप, डॉ. संदीप बुटाला, राजाभाऊ घोडके, डॉ. सुहास पांडे, संयोजक श्रीकांत मुंदडा उपस्थित होते.
श्रीकांत मुदंडा म्हणाले, ह्दयमित्र प्रतिष्ठान महाराष्ट्रभर चांगले काम करत आहे. ह्दयरोग व मधुमेहावर उपचार पध्दती यावर प्रतिष्ठान सातत्याने विनामूल्य प्रशिक्षण देत असते. महिलामध्ये ह्दयविकाराचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. मधुमेहाची पुढची पायरी ही ह्दयविकाराची असते. शरीराच्या बाबतीत सर्वानी गांभीर्य घेवून त्याची काळजी घेतली पाहिजे़
डॉ. एरंडे म्हणाले, मधुमेह हा आजार पूर्वकल्पना न देता होणारा आजार आहे़ जे लोक सातत्याने बसून राहतात़ त्यांच्यामधे मधुमेह हा आजार जास्त बळावतो. स्त्रिया व्यायामाला जास्त महत्व देत नाहीत़ वजनाच्या बाबतीत ते शरीराकडे जास्त लक्ष देत नाहीत़ स्त्रियांना कमी महत्व देण्याची ऐतिहासिक पध्दत यामुळे स्त्रियामध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. आज जगामध्ये ४२ कोटी रूग्ण मधुमेहाचे आहेत़ त्यामध्ये निम्म्या स्त्रिया आहेत़ भारतामधे मधुमेहाचे ७ कोटींच्या आसपास रूग्ण आहेत. जगामधे दरवर्षी २ करोड मृत्यू मधुमेहामुळे होतात. मानसिक ताणतणाव, नैराश्य, स्थूलपणा, वैद्यकीय सोयीची अपूर्तता यामुळेही मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे आढळून येत आहे.