पुणे : राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केला असून आता रात्री संचारबंदी लागू राहणार नसून जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येणे व फिरणे याला मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवा तसेच वस्तू यांना यातून सवलत देण्यात आली आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानुसार ५ जानेवारीपर्यंत दररोज रात्री २३ ते दुसरे दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यात ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र येण्यास व फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याअगोदर २२ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारास मनाई करण्यात आली होती. त्यात आता बदल करुन लोकांना जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
पुण्यातील रात्रीच्या संचारबंदीत बदल; आता संचारबंदी नव्हे तर जमावबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 10:18 AM