पुणे - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी बुधवार, दि. ११ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पुढील वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रवेशाची दुसरी फेरी १२ जुलैपासून सुरू होणार असून १६ जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यापैकी ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी दिलेल्या १० पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले होते. मात्र या ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी मंगळवार अखेरपर्यंत २० हजार ६९१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. मात्र अद्याप २० हजार ९८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. दरम्यान, पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.दुसऱ्या फेरीमध्ये १२ व १३ जुलै २०१८ रोजी महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचे कटआॅफ १२ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलता येतील. दुसºया फेरीची गुणवत्ता यादी १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे.तिसºया फेरीमध्ये १९ व २० जुलै रोजी पसंतीक्रम बदलता येतील. तिसºया फेरीची गुणवत्ता यादी २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. त्यानंतर चौथ्या फेरीला २७ व २८ जुलै २०१८ रोजी सुरुवात होणार आहे. ३० जुलै रोजी चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.
अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल, दुसरी फेरी उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 4:20 AM