पुणे : रोजंदारीवरील (बदली) कामगारांची सेवाज्येष्ठता डावलून काही कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच, या बदल्यांचे कार्यालयीन आदेशही काढले आहेत. त्यामुळे सेवाज्येष्ठ महिला कामगारांवर अन्याय झाला आहे, अशी तक्रार पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) बदली महिला कामगारांनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.पीएमपीच्या महाव्यवस्थापकांनी काही दिवसांपूर्वी एका बदली महिला वाहकाची बदली पास विभागात केली आहे. तर, तत्कालीन वाहतूक व्यवस्थापकांनीही काही महिन्यांपूर्वी तीन कामगारांच्या बदल्या इतर आगारांत केल्या आहेत. याविरोधात पीएमपीतील सुमारे २५ महिला बदली कामगारांनी आवाज उठविला आहे. त्यामध्ये बदली महिला वाहक व झाडूवाल्या महिलांचा समावेश आहे. बदली वाहक महिलांमध्ये अनेक महिला मागील काही वर्षांपासून सेवेत आहे. यापूर्वी त्यांच्याबाबत कधीही सेवाज्येष्ठता डावलून बदली केलेली नाही. किंबहुना, त्याचा कार्यालयीन आदेश काढलेला नाही. तसेच सध्या काही झाडूवाल्या महिला पास विभागात कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्याबाबत असा आदेश काढलेला नाही. पास विभागात काम करूनही त्यांना झाडूवाला पदाचेच वेतन मिळते. असे असताना केवळ काही कामगारांनाच प्रशासन वेगळा न्याय लावत असल्याची भावना या महिला कामगारांनी व्यक्त केली. त्याबाबत त्यांनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा व महाव्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली आहे. आधीचे आदेश रद्द करावेत; अन्यथा काही बदली वाहकांनी आमचीही पास विभागात बदली करावी, अशी मागणी केली आहे.
सेवाज्येष्ठता डावलून बदल्या
By admin | Published: July 25, 2015 4:21 AM