- राजानंद मोरेपुणे : देशातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधून पदवी व पदव्युत्तर पदवी घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी रोजगारासाठी कुशल नसतात. हे चित्र बदलण्यासाठी महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता, कौशल्य, दृष्टीकोन, मिळालेल्या ज्ञानाचे मुल्यमापन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृतीवर आधारीत शिक्षण आणि मुल्यमापनावर भर देण्याची गरज आहे. अभ्यासक्रम तयार करताना त्यातून विद्यार्थ्यांना काय मिळेल (लर्निंग आऊटकम्स), त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज असून त्यादृष्टीने परीक्षा व मुल्यमापनाच्या पध्दतीत बदल करणे अत्यावश्यक असल्याच्या शिफारशी विद्यापीठ अनुदान आयोगाने मुल्यमापन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या समितीने केल्या आहेत.
समितीच्या शिफारशींचा अहवाल दोन दिवसांपुर्वी आयोगाने खुला केला आहे. या अहवालावर शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, परीक्षा विभाग प्रमुख यांच्यासह सर्व संबंधितांकडून सुचना मागविण्यात आल्या आहे. त्यासाठी दि. ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय स्तरावरही ‘लर्निंग आउटकम्स’ निश्चित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण स्तरावरही हीच पध्दत अवलंबण्यासाठी आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या मुल्यमापन पध्दतीमध्ये सुधारणा करण्यासाठी मागील वर्षी दहा सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने याबाबतीत अनेक शिफारशी केल्या आहेत. भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे या समितीचे अध्यक्ष होते.
समितीच्या शिफारशींविषयी ‘लोकमत’शी बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले, सध्या पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावर अभ्यासक्रम, अध्यापनातून केवळ माहिती दिली जाते. त्यावरच परीक्षा घेतल्या जातात. त्यानुसार विद्यार्थ्यांचे मुल्यमापन होते. विद्यार्थी केवळ गुण मिळविण्यासाठी परीक्षा देतात. एकीकडे विद्यार्थी रोजगारक्षम झाले पाहिजेत, असे आपण म्ह्णतो. पण जोपर्यंत परीक्षा व मुल्यमापनाच्या पध्दतीत बदल होत नाही, त्यांच्यामधील कौशल्याला चालना मिळत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. विद्यार्थ्यांना दिलेल्या ज्ञानातून त्यांच्यातील कौशल्य, कल्पकता व नाविण्यता तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यासक्रम बनवितानाच त्यातून विद्यार्थ्यांना कोणते ज्ञान मिळेल, हे निश्चित माहिती असायला हवे. त्यानंतर परीक्षा पध्दत व मुल्यमापन करतानाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमतांचा अभ्यास व्हायला हवे. त्यासाठी समितीने काही ‘मॉडेल्स’ची शिफारस केली आहे. अभ्यासक्रम करताना काय काळजी घेतली पाहिजे, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कसे हवे, मुल्यमापनाची पध्दत कशी असावी, याबाबतीत शिफारशी आहेत. तसेच या शिफारशी बंधनकारक नसतील.
कृतीवर आधारीत शिक्षणालाही महत्व देण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करताना लवचिकता आणणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे सातत्याने अंतर्गत मुल्यमापन करून त्यांच्यातील कमतरता लक्षात घ्याव्यात. त्यांच्यातील क्षमतांना चालना द्यायला हवी. त्यादृष्टीने परीक्षा पध्दत विकसित करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने एखाद्या प्रश्नाचे उत्तर कसे सोडविले, त्यासाठी कोणते तंत्र, कौशल्य वापरले, गुण किती मिळाले या प्रत्येक बाबीचा अभ्यास झाल्यास अध्यापनातील त्रुटीही पुढे येऊ शकतात, याबाबतीत सुधारणा सुचविल्या असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
समितीने केलेल्या काही शिफारशी- मुक्त व दुरस्थ विद्यार्थ्यांसाठी ‘आॅन डिमांड’ परीक्षा हवी- परीक्षा पध्दतीत लवचिकता आणणे गरजेचे- परीक्षांचे निकालाची कालमर्यादा निश्चित करून त्याचे पालन व्हावे- गुणपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत सविस्तर माहिती हवी- क्रेडिट किंवा ग्रेडींग पध्दत ठोकळेबाज नको- अंतर्गत मुल्यमापन सातत्याने व्हावे- मुल्यमापनासाठी लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक व एकात्मिक पध्दतींचा वापर व्हावा- प्रश्नपत्रिकांतून विद्यार्थ्यांच्या सर्व कौशल्याचा कस लागावा- प्रश्नांची बँक तयार करावी