पुणे : मध्य रेल्वेकडून काही गाड्यांच्या वेळा व थांब्यांमध्ये बदल केला आहे. त्यामध्ये पुण्यातून सुटणाऱ्या दानापूर व जयपूर एक्स्प्रेसचा समावेश आहे. दि. १ डिसेंबरपासून नवीन वेळापत्रकानुसार गाड्या धावतील.
रेल्वेकडून दर वर्षी १ डिसेंबरपासून काही गाड्यांच्या वेळा बदलल्या जातात. नवीन वेळापत्रकानुसार, पुणे-दानापूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्यातून रात्री ९.०५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे २.२० वाजता दानापूरमध्ये पोहचेल. तर, रात्री ११.१० वाजता दानापूरमधून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४.४० वाजता पुण्यात दाखल होईल. जयपूर एक्स्प्रेस प्रत्येक बुधवार व रविवारी सायंकाळी ५.३० वाजता पुण्यातून रवाना होईल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी २.४० वाजता जयपूर स्थानकात पोहचेल. ही गाडी प्रत्येक मंगळवार व शनिवारी दुपारी १२.२० वाजता जयपूरमधून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०५ वाजता पुण्यात येईल.
तसेच पुणेमार्गे धावणाऱ्या कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-बंगळुरू व मुंबई-गदग एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळांमध्येही बदल केला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी रेल्वेचे संकेतस्थळ पाहावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे. दरम्यान, पुणे-जबलपूर या साप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दि. २९ डिसेंबरपर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.