पुणे : मेट्रोच्या भूमिपूजन उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी शहरात आगमन होत असून, त्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात सायंकाळी सहा वाजता भूमिपूजनाचा सोहळा सुरू होणार आहे. पंतप्रधान पुणे विमानतळाहून कृषी महाविद्यालयात मोटारीने येणार आहे. त्यामुळे सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल कॉर्नर चौक दरम्यानचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. फर्ग्युसन रोड आणि सिमला आॅफिस चौकाकडून येणाऱ्या वाहनचालकांनी सिमला आॅफिस ते रेंजहिल कॉर्नर येथील उजव्या बाजूने सिंचननगर येथे आपली वाहने पार्क करावी. पाषाण, बाणेर आणि औंध रोडने येणाऱ्या वाहनांनी रेंजहिल कॉर्नर येथून डाव्या बाजूने जाऊन सिंचननगर येथे वाहने लावावीत. आरटीओ, संगमवाडी व संचेतीकडून तसेच होळकर ब्रीज येथून येणाऱ्या वाहनांनी पोल्ट्री फॉर्म चौकातून सरळ जाऊन सिंचननगर येथे वाहने पार्क करावी. जुन्या मुंबई रोडने निगडी आणि भोसरीकडून येणाऱ्या वाहनांनी शासकीय दूध डेअरी येथून यू टर्न घेऊन पोल्ट्री फॉर्म चौकातून डाव्या बाजूने सिंचननगर येथे वाहने पार्क करावीत. वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. (प्रतिनिधी)
पंतप्रधान दौऱ्यानिमित्त वाहतुकीमध्ये बदल
By admin | Published: December 24, 2016 12:57 AM