पुणे - ऐतिहासिक लालमहालाचे सुशोभीकरण करण्यासाठी व अंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या सुशोभीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.याबाबत मुळीक यांनी सांगितले की, पुण्याचे वैभव असलेल्या लालमहालात मराठा शैलीमध्ये सुशोभीकरण व विविध विकासकामे करण्यात येणार आहे. यामध्ये प्लॅस्टर, रंगकाम, पहिल्या दर्जाचे टिकवूड व आॅरनामेंटल टिकवूडचा वापर, नेवासा बेसाल्ट, नेवासा बायसन पॅनेल सीट आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आर. पी. चित्रोडा यांच्या पंचाहत्तर लाख चोपन्न हजार सातशे रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली.लालमहाल या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने सुशोभीकरण व डागडुजीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तो चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.शहाजीराजे भोसले यांनी १६३० मध्ये त्यांची पत्नी जिजाऊ आणि मुलगा शिवाजीमहाराज यांच्यासाठी हा महाल बांधला होता.
लालमहालाचा होणार कायापालट, स्थायी समितीची कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 1:28 AM