लोणी काळभोर : सात-बारा उताऱ्यात कधी नजरचुकीने तर कधी जाणीवपूर्वक चुका झाल्याने संबंधित मालमत्ताधारकाला वर्षानुवर्षे तापदायक ठरतात. कायदेशीर तरतूद असूनही काही तांत्रिक कारणामुळे या चुका दुरुस्तीला विलंब होतो. त्यामुळे अशा चुकांचा निर्गमी निपटारा व्हावा म्हणून प्रत्येक मंडलाधिकारी कार्यक्षेत्रात महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. या अदलातीमुळे वेळेची बचत आणि मानसिक त्रास कमी होणार असल्याचे प्रतिपादन हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी केले.
थेेेऊर (ता. हवेली) कार्यक्षेत्रातील गावांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन बारवकर यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी थेेेऊर मंडल अधिकारी गौरी तेलंग, तलाठी सविता काळे ( थेऊर ), दादासाहेब झंजे ( लोणी काळभोर ), राजेश दिवटे ( कोलवडी ), योगिराज कनिचे ( मांजरी बुद्रुक ), कोतवाल दशरथ वगरे व मदतनीस बंटी राजपुरे उपस्थित होते.
या शिबिरात प्रलंबित नोंदींची निर्गती करून प्रमाणीत ७/१२ चे वितरण, नवीन फेरफार दाखल, ७/१२ मधील गुणवत्ता आधारित विविध दुरुस्ती, नोंदणीकृत व अनोंदणीकृत नोंदी, विविध स्वरूपातील अहवालातील दुरुस्ती करून संगणीकृत ७/१२ चे वाचन करून संजय गांधी निराधार योजनेचे दाखले वितरित करण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
२५ लोणी काळभोर
फेरफार अदालतीमध्ये मार्गदर्शन करताना सचिन बारवकर.