पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये तरुणांना हृद्यविकाराचा झटका अाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समाेर अाल्या अाहेत. माजी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांच्या 21 वर्षीय मुलाचेही ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने, तरुणांमध्ये वाढत चाललेल्या हृद्यविकाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत अाहे. जंकफूड, पुरेशी झाेप न घेणे, सततचा ताण, माेबाईलचा अतिवापर, व्यायामाचा अभाव ही तरुणांची बदलती जीवनशैली हृद्यविकारांना अामंत्रण देत असल्याचे समाेर अाले अाहे. तरुणांमध्ये हृद्यविकाराचा धाेका दिवसेंदिवस वाढत अाहे. मागील काही काळात तरुणांचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे समाेर अाली हाेती. काही दिवसांपूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू हृद्यविकाराच्या झटक्याने झाला हाेता. तरुणांमध्ये या वाढत्या अाजाराविषयी लाेकमतने ससूनचे हृद्यविकारतज्ञ डाॅ. हेमंत काेकणे यांच्याशी संवाद साधला. जंकफूड, माेबाईलचा अतिवापर, व्यायामाचा अभाव अाणि बदललेली जीवनशैली ही अाजच्या तरुणाईतील हृद्यविकाराची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. डाॅ. काेकणे म्हणाले, तरुणांना येणारा हृद्यविकाराचा झटका अाणि त्यात त्यांचा हाेणारा मृत्यू ही अाज तरुणांमधील माेठी समस्या अाहे. तरुणांमध्ये हृद्यविकाराच्या समस्या वाढत चालल्या अाहेत.याला अनेक कारणे अाहेत, त्यात काही टाळण्यासारखी अाहेत तर काही टाळता येऊ न शकणारी. न टाळता येऊ शकणाऱ्या कारणांमध्ये अनुवंशीकता, उच्च रक्तदाब, डायबेटिस ही कारणे अाहेत. राेजचा कामाचा ताण, कामातील स्पर्धा, कमी झाेप घेणे त्याचबराेबर माेबाईल व साेशल मिडीयाचा अतिवापर ही सध्या तरुणांमध्ये हृद्यराेगाला अामंत्रण देणारी कारणे अाहेत. सध्या तरुणाई जंकफूडचे अतिसेवन करताना अाढळते . तसेच व्यायामही केला जात नाही. या जाेडीलाच धूम्रपान यांसारख्या गाेष्टींमुळेही तरुणांमध्ये हृद्यराेग बळवताना दिसत अाहे. अाधी वयाच्या 55 व्या वर्षाच्या पुढे हृद्यविकाराच त्रास हाेत हाेता, अाता हे वय 25 वर येऊन ठेपले अाहे. हि स्थिती नक्कीच काळजी करण्यासारखी अाहे. राेज अामच्याकडील हृद्यविकाराच्या रुग्णांमध्ये जवळजवळ 40 टक्के रुग्ण हे तरुण अाहेत. तरुणांनी अापल्याला हृद्यविकारचा त्रास हाेऊ नये यासाठी काळजी घेणे अावश्यक अाहे. जी टाळता येण्यासारखी कारणे अाहेत ती टाळायला हवीत. तरुणांनी जास्त ताण घेऊ नये. अाठवड्यातून किमान 5 दिवस राेज 30 मिनिटे व्यायाम करायला हवा. कमीत कमी बैठी कामं करावीत. शक्यताे जंकफूड खाणे टाळायला हवे. त्याचबराेबर हृद्यविकाराचा झटका येऊन गेलेल्या रुग्णाची याेग्य काळजी घेणे अावश्यक अाहे. तरुणांनी अापली जीवनशैली बदलली तर या हृद्यविकाराच्या समस्येपासून सुटका करुन घेता येईल.
बदलती जीवनशैली तरुणांमधील ह्रद्यविकाराचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 8:29 PM