पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी सेनापती बापट रस्त्याने टाकण्याचे नियोजन होते; पण जी-२० परिषद या रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. त्यामुळे या रस्त्याने जलवाहिनी टाकण्याचे काम रद्द करून पत्रकारनगर रस्त्याने गोखलेनगर वस्तीतून टाकण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे जलवाहिनीचे अंतर वाढून मोठ्या प्रमाणावर खर्च वाढेल. यात पालिकेचे माेठे नुकसान होणार आहे.
जगातील आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांची 'जी-२० परिषद' २०२३ मध्ये पुण्यात होणार आहे. या परिषदेच्या जानेवारी आणि जूनमध्ये पुण्यात तीन बैठका होणार आहेत. यासाठी विविध ३४ देशांचे १२० ते १३० प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. पहिली बैठक दि. १५ ते १७ जानेवारीदरम्यान होणार आहे. परिषदेचे प्रतिनिधी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता आणि इतर काही भागांतून प्रवास करणार आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी सेनापती बापट रस्त्याने टाकण्याचे नियोजन होते; पण जी-२० परिषद या रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असल्याने या रस्त्याने जलवाहिनी टाकण्याचे काम रद्द करून मार्ग बदलला जात आहे. यात गोखलेनगर भागातील रस्त्यावरून ८०० एमएमची जलवाहिनी टाकताना नागरिकांना प्रचंड त्रास हाेणार आहे.
आयुक्तांना निवेदनया रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची वर्दळ आणि गर्दी असते. त्यात रस्ते खोदाई केल्याने या परिसरात वाहतूक ठप्प होणार आहे. परिणामी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागणार आहे. जी-२० परिषद संपल्यावर सेनापती बापट रस्त्यानेच ही पाइपलाइन टाकावी, अशी मागणी माजी नगरसेवक नीलेश निकम यांनी केली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निवेदन दिले आहे.