पुणे : अनेकदा गरज नसतानाही ठराविक पॅकेजच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी हवे नसलेले चॅनेल देखील मारले जातात. त्याचे पैसे देखील ग्राहकांना इच्छा नसताना द्यावे लागतात. या दुष्टचक्रातून ग्राहकांची सुटका करण्यासाठी सरकारने आपल्या पसंतीचे चॅनेल निवडण्याचा अधिकार ग्राहकांना दिला आहे. मात्र, योजना लागू होण्यास अवघे तीन दिवस राहिल्यानंतरही केबल कंपन्यांकडे त्याबाबतची कोणतीच माहिती नाही. त्यामुळे योजना लागू होण्यापूर्वीच चॅनेल योजनेची खरखर ग्राहकांना ऐकावी लागत आहे.टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी आॅफ इंडियाने (टीआरएआय) आपल्या पसंतीचे चॅनेल निवडण्याचा अधिकार ग्राहकांना देऊ केला आहे. येत्या २९ डिसेंबरनंतर ही योजना लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.यापूर्वी मराठी, मल्याळम, तेलुगू, गुजराती, कन्नड, इंग्रजी अशा दोनशे-अडीचशे चॅनलची भेळ ग्राहकांना घ्यावी लागत होती. अगदी एखाद्या व्यक्तीला मल्याळम आणि तेलुगू भाषा समजत नसली तरी असे चॅनेल पॅकेजमध्ये घ्यावे लागत होते. आता ही अडचण दूर होणार असल्याचे सांगितले जात आहे. टेलिकॉम अॅथोरिटीच्या नियमानुसार प्रत्येक केबल सुविधा पुरविणाऱ्या चॅनेल्सला १०० मोफत चॅनेल दाखवावे लागतील. त्यासाठी देखील दरमहा १३० रुपये मोजावे लागतील. त्यानंतर पसंतीच्या चॅनेलसाठी ठराविक पैसे मोजावे लागतील. मात्र, या योजनेतील नक्की अटी काय आहेत याची माहितीच अद्यापही जाहीर करण्यात आली नसल्याने योजना लागू होणार की नाही याबाबत साशंकता आहे.याबाबत हॅथवे या केबल कंपनीशी ग्राहक सेवेच्या टोल फ्री क्रमांकावरून संपर्क साधला असता या नवीन योजनेपर्यंत अद्याप काहीच माहिती आलेली नाही. आपण २९ डिसेंबरनंतर फोन करावा, अशी विनंती करण्यात आली. नेक्स्ट जनरेशन या केबल नेटवर्क कंपनीच्या प्रतिनिधीने देखील पसंतीचे चॅनेल निवडण्याच्या योजनेची माहिती नसल्याचे उत्तर दिले. २८ डिसेंबरला फोन करण्याची विनंती केली.ग्राहकांना पसंतीनुसार चॅनेल निवडण्याचा अधिकार द्यावा, असा आदेश ट्रायने डायरेक्ट टू होम (डीटूएच) सर्व्हिस देणाºया सर्व कंपन्यांना दिला आहे. मात्र, नवीन नियम नक्की काय आहेत त्याचा खुलासा अद्यापही झालेला नाही. तसेच एखाद्या ग्राहकाला केवळ दोनच चॅनेल घ्यायचे असतील तर त्यास तशी मुभा असेल का? या दोन चॅनेलसह मोफत चॅनेल दिसतील का? पॅकेज संपल्यानंतरही पुन्हा नवीन रिचार्ज करेपर्यंत मोफत चॅनेल दिसतील का? असे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत.- विलास लेले,अखिल भारतीय ग्राहक पंचायत
चॅनेल पसंतीच्या योजनेत ‘खरखर’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 2:22 AM