पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यात मदत केल्याचे उघड झालेल्या सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ललित पाटील प्रकरणातील एकूण १४ आरोपींपैकी सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
दत्तात्रय ढोके (वय ४०, रा. हडपसर), अर्चना निकम (३३), प्रज्ञा कांबळे (३९), भूषण पाटील (३४), अभिषेक बलकवडे (३१, सर्व रा. नाशिक), रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अऱ्हाना (५०, रा. कॅम्प) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, असे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, ललित पाटील प्रकरणात अटकेत असलेले ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते, येरवडा कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे आणि कारागृहातील गार्ड मोईस शेख यांना न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.
डाॅ. प्रवीण देवकाते यांनाही अटक
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस करणाऱ्या येरवडा कारागृहातील डॉ. संजय मरसाळे याच्यानंतर ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते (४०) याला सोमवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेने अटक केली. डॉ. देवकाते याने आरोपी भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, महेंद्र शेवते व ललित पाटील यांच्याशी संगनमत करून ससूनमध्ये ललितला दाखल करण्यास व पळून जाण्यास वेळोवेळी मदत केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने डॉ. देवकाते याला ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ललित पाटील प्रकरणात सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या शिफारशीनुसार डॉ. देवकाते याला निलंबित केले होते.