पुणे : शिवप्रताप दिन कार्यक्रमात मुस्लिम व ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या जातील, तसेच धार्मिक श्रद्धांचा अपमान करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी समस्त हिंदु आघाडी संघटनेचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे (milind ekbote) यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपूरे, कालीचरण महाराज (रा. अकोला), कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान) आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवार पेठेतील नातुबाग मैदान येथे समस्त हिंदु आघाडी संघटनेतर्फे शिवप्रतापदिन अर्थात अफझलखान वधाचा आनंदोत्सव या कार्यक्रमाचे १९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकबोटे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
समस्त हिंदु आघाडीच्या वतीने दरवर्षी शिवप्रतापदिन कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमात भाषण करताना मिलिंद एकबोटे यांनी मुस्लिम व ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य केले. धार्मिक श्रद्धांचा अपमान करुन धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याचे उद्देशाने व बुद्धीपुरस्पर व दृष्ट उद्देशाने हावभाव करुन चिथावणीखोर भाषण केले.
सुत्र संचालन करणारे नंदकिशोर एकबोटे यांनी त्यांच्या भाषणांचा त्यांच्या बोलण्यात पुन्हा थोडक्यात उल्लेख करुन तेथे जमलेल्या लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या व्हिडिओ क्लिपची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.