धनकवडी : कात्रज परिसरात मंगळवारी ( दि. २९) झालेल्या सिलेंडर स्फोटप्रकरणी पोलिसांनी चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. सागर पाटील हा सिलेंडर व्यावसायिक असून, जागेच्या मालकासहीत आणखी दोघांवर भादंवि (भारतीय दंड संहिता विधान) कलम 436, 308 आणि 285 अन्वये कारवाई करण्यात आलीय. विनापरवाना सिलिंडर्सचा साठा करून बेकायदा गॅस फिलिंगचा उद्योग या दुर्घटनेमुळे उघडकीस आला आहे.
सागर संदीप पाटील ( वय २६), सोनू मांगडे, संपत सावंत आणि दत्तात्रय काळे ( सर्व रा. कात्रज ) ही संशयित आरोपींची नावे आहेत. काळे हा जागामालक असून तेथे पाटील याने गॅस रिफिलिंगचा बेकायदा उद्योग सुरू केला होता. त्यासाठी त्याने तेथे १०० हुन अधिक सिलिंडर्स आणून ठेवले होते. तेथे मोठ्या सिलिंडर्समधील गॅस छोट्या टाक्यांमध्ये भरण्याचे काम सुरू असतानाच वायू गळती होऊन तेथे एकापाठोपाठ २५ सिलिंडर्सचे स्फोट झाले. आजूबाजूच्या घरांना आगी लागल्या. संपूर्ण कात्रज परिसर या स्फोटांनी हादरला. त्यामध्ये संपूर्ण गोडावून भस्मसात झाले; तसेच तेथील चारचाकी दोन वाहनेही आगीत जाळून खाक झाली.