धनंजय बाबूराव रेड्डी (वय ३०, सध्या रा. महाळुंगे इंगळे) असे आत्महत्या केलेल्या कर्जदाराचे नाव आहे. त्यांचा भाऊ योगेश बाबूराव रेड्डी (वय ४१, रा. प्राधिकरण, चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. योगेश यांच्या फिर्यादीवरून सूरज चंद्रकांत गजरे (रा. गुळवेवस्ती, भोसरी) या सावकारासह त्याचा मित्र (नाव, गाव व पत्ता निष्पन्न नाही) यांच्यावर गु.र.नं.१११८/२०२१ नुसार, भा.दं.वि.कलम ३६५, ३४१, ३०६, ३४ सावकारी कायदा कलम क्र. ३९ व ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक वृत्त असे की, योगेश यांचा भाऊ धनंजय यांनी सूरज याच्याकडून काही कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या रकमांच्या जादा व्याज दरासाठी सूरज हा त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देत अपहरण करून मारहाण करत होता. सावकाराकडून नेहमी होत असलेल्या जाचहाटाला कंटाळून आलेल्या नैराश्यातून धनंजय याने राहत्या घरी आत्महत्या केली होती. धनंजय याने स्वहस्तलिखित लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम गुळीग व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.