बारामतीत सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:30 IST2025-01-07T10:30:44+5:302025-01-07T10:30:55+5:30
दिवसेंदिवस दुचाकी आणि चारचाकी ई-व्हेईकलमध्ये वाढ होणार असल्याने भविष्यात चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे.

बारामतीत सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार - अजित पवार
बारामती : राज्यात ई-व्हेईकलचे महत्त्व वाढत आहे. दिवसेंदिवस दुचाकी आणि चारचाकी ई-व्हेईकलमध्ये वाढच होणार आहे. त्यामुळे भविष्यात चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. शहर आणि तालुक्यातील सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांची माेठी सोय होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या मेडद येथील नूतन पेट्रोल पंप इमारत व एमआयडीसी पेट्रोल पंप नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले की, बारामतीत चार्जिंग स्टेशन देण्याबाबत संबंधितांना विनंती केली आहे. भविष्यातील वाढती गरज पाहता याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. खरेदी विक्री संघाच्या मेडद येथील नूतन पेट्रोल पंप इमारतीच्या जागेत मंगल कार्यालय उभारण्याबाबत संचालक मंडळाने निर्णय घ्यावा. लवकरच या परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे विकसित करण्यात येईल. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. संबंधितांनी सहकार्य केल्यास रस्त्याची कामे वेळेत मार्गी लागतील. यावेळी चेअरमन विक्रम भोसले यांनी संस्थेचा आढावा घेतला. यावेळी राजवर्धन शिंदे, सचिन सातव, संभाजी होळकर, केशवराव जगताप, पुरुषोत्तम जगताप, व्हाइस चेअरमन सोनाली जायपत्रे, संचालक दत्तात्रय आवाळे, विजय शिंदे, भारत ढवाण, लक्ष्मण जगताप, ॲड. रवींद्र माने, बाळासाहेब मोरे, बाबूजी चव्हाण, संभाजी जगताप, अशोक जगताप, लता जगताप, शिवाजी टेंगले, ज्ञानदेव नाळे, उदयसिंह धुमाळ, रमेश देवकाते, नितीन देवकाते, व्यवस्थापक नीलेश लोणकर, आदी उपस्थित होते.