नारायणगाव : नारायणगाव येथील कोल्हेमळा येथून सात महिन्यांपूर्वी चोरीस गेलेले २ लाख ३८ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्याकडून पुन्हा हस्तगत करून फिर्यादी महिलेस हे दागिने सुपूर्त करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी नारायणगाव पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज अर्जुन डोणे (वय २६), अविनाश अर्जुन डोणे (वय २१, रा. निरजगाव, कवडेवस्ती, ता. कर्जत, जि. अहमदनगर) या आरोपींसह सोने विकत घेणारा निलेश कुंदनलाल झाडमुथा (वय ३८ रा. डोंगरगण, ता.आष्टी, जि. बीड) या आराेपीकडून सोने हस्तगत करण्यात आले आहे.
पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने एका गुन्ह्यात अटक केलेले आरोपी युवराज अर्जुन डोणे व अविनाश अर्जुन डोणे यांनी नारायणगाव येथे चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. नारायणगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता या आरोपींनी नारायणगाव येथील कोल्हेमळ्यात राहत असलेल्या वनिता सुधाकर विटे यांच्या घरातून रोख रकमेसह दागिने चोरून नेल्याचे कळले. पोलिसांनी याबाबत चोरीचा गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी चोरीतील रोख रक्कम खाण्यापिण्यासाठी खर्च केली आणि सोन्याचे मंगळसूत्र व कानातील टॉप्स हे निलेश कुंदनलाल झाडमुथा यांना विकले असल्याचे सांगितले. या झाडमुथा या आरोपीकडून पोलिसांनी २ लाख १६ हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र आणि चैन पट्ट्या, दोन वाट्या असे ४८ ग्रँम तसेच २२ हजार ५०० रुपये किमतीचे एक जोड, कानातील टॉप्स असे ५ ग्रँम सोन्याचे दागिने हस्तगत केले. हे दागिने जुन्नर न्यायालयाच्या आदेशान्वये विटे यांच्याकडे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सुपूर्द केले.
फोटो ओळ : नारायणगाव येथील कोल्हेमळा येथून सात महिन्यांपूर्वी चोरीस गेलेले दागिने चोरट्याकडून पुन्हा हस्तगत करून ते वनिता सुधाकर विटे यांना देताना करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे.