लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेच्या वतीने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांच्या परीक्षेसाठी ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित केले आहे. ही परीक्षा देणाऱ्या मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी-मराठा समाजातील इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी १३ ऑगस्टअखेरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले.
सारथी संस्थेच्या वतीने मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी-मराठा समाजातील मुला, मुलींच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून सारथी संस्थेच्या वतीने आता हे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा परीक्षेमार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी विधी पदवीधर किंवा वकील, अॅटर्नी अधिवक्ता असावा. पात्र उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर याठिकाणी निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येईल. हा उपक्रम पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड सामाईक प्रवेश चाचणीद्वारे (सीईटी) गुणवत्तेनुसार करण्यात येईल. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काकडे यांनी केले आहे. सारथी संस्थेच्या https://sarthi या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल.