पुणे : लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्यातील अनलॉक काळात अनेक उद्योग व्यवसाय सुरु होत असून जिल्हा न्यायालयांप्रमाणे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कामकाज सुरु झाले आहे. तात्काळ दाव्यांवर सुनावणी घेण्यात येणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात दाव्याबाबतची सर्व न्यायिक कामे पूर्णपणे बंद होती. त्यामुळे कामकाज सुरु करावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने निवेदन देऊन केल्याचे अध्यक्ष अॅड मुकेश परदेशी यांनी सांगितले. या मागणीचा विचार करुन धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी आता न्यायिक प्रकरणे व हिशोब पत्रके दाखल करुन घेण्यास व प्रमाणित प्रती देण्यास परवानगी दिली़ आहे. कामकाजासाठी ८ खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. सर्व खबरदारी घेऊन ही कामे करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. एखादा दावा तातडीचा असेल तर पूर्वपरवानगीने त्यावर सुनावणीही घेण्यात येणार आहे. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोशिएशनचे विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागीरदार यांनी सांगितले की, वकील व पक्षकार यांच्या दृष्टीने न्यायिक प्रकरणे दाखल करुन घेण्याचे कामकाज सुरु होणे, हे महत्वाचे पाऊल आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तालयातील दाखल प्रकरणाच्या सुनावणीला चालना मिळेल.