पुणे: मराठी माणसांचे नाट्यप्रेम हे सर्वश्रुत आहेच. तो कुठेही गेला तरी नाटकांचे वेड राहतेच. म्हणूनच जागतिक स्तरावर मराठी रंगभूमीने मोठे स्थान मिळविले आहे. आज नाटकाचे प्रयोग विविध देशांमध्ये होत आहेत. याच ऋणानुबंधातून अमेरिकेत वास्तव्य असलेल्या भारतीयांनी पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कॅलिफोर्नियातील रंगमंच संस्था आणि बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्यासह उत्तर अमेरिकेतील अनेक नाट्यसंस्था, नाट्य कलाकार आणि रसिकांनी मिळून सुमारे 14 लाख रुपयांचा मदतनिधी उभारला आहे. हा मदतनिधी महाराष्ट्र दिनी (1 मे ) कलाकारांना दिला जाणार असल्याची माहिती बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेचे भारतीय समन्वयक राजीव केतकर यांनी दिली. कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून रंगभूमीचा पडदा उघडलेला नाही. महाराष्ट्रातील सगळे नाट्यप्रयोग पूर्णपणे बंद पडले आहेत . अशा अवस्थेत या हातावर पोट असणार्या या पडदयामागच्या कलाकारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. त्यांना मदत करण्यासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून अनेक हात पुढे येत आहेत. यासाठीच सर्व संस्थांनी एकत्र येऊन मदतनिधी उभारला आहे. बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्ष विद्या जोशी, रंगमंच संस्थेचे संस्थापक माधव आणि स्मिता कर्हाडे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण अमेरिकेतील नाट्यसंस्था या उपक्रमात सहभागी झाल्या. अभिनेते विजय केंकरे, अजित भुरे, प्रशांत दामले, अमेय वाघ, संकर्षण कर्हाडे, जादूगार जितेंद्र रघुवीर, अमेरिकेतील मीना नेरुरकर आणि अनेक स्थानिक कलाकारांनी देखील मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर 15 दिवसांत 14 लाख रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन आणि वेगवेगळ्या संस्थांना हा मदतीनिधी कलाकारांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र फाउंडेशनचे वैभव साठे, राजीव भालेराव यांनी सहकार्य केले आहे.महाराष्ट्र दिनी आत्तापर्यंत संकलित झालेल्या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याचे केतकर यांनी सांगितले. याशिवाय बृहन महाराष्ट्र मंडळाने ' कोव्हिड 19' हेल्पलाईन देखील सुरू केली असल्याचे ते म्हणाले.
मराठी नाटकांच्या प्रेमापोटी अमेरिकेतील संस्थाचा पडद्यामागच्या कलाकारांसाठी मदतनिधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 7:12 PM
कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून रंगभूमीचा पडदा उघडलेला नाही...
ठळक मुद्देजागतिक स्तरावर मराठी रंगभूमीला मोठे स्थान : 1 मे ला होणार वितरणअमेरिकेतील नाट्यसंस्था, नाट्य कलाकार आणि रसिकांनी मिळून 14 लाख रुपयांचा मदतनिधी