लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कायद्यानुसार निश्चित केलेल्या प्रमाणात सर्व धर्मादाय रुग्णालयांनी गरीब व सर्वसामान्य रुग्णांना मोफत व सवलतीत उपचार देणे बंधनकारक आहे. त्यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील ५५ धर्मादाय रुग्णालयांत असे उपचार दिले जातात का, यांची अचानक भेट देवून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच धर्मादाय रुग्णालयांचे ऑडिट वेळेवर पूर्ण करा, अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अशोक पवार, राहुल कुल, संजय जगताप आदी उपस्थित होते. धर्मादायकडून मिळणार्या दवाखान्यांमध्ये गरिबांना मोफत, मध्यमवर्गीयांना अल्पदरात उपचार मिळतात. मात्र शहरातील काही रुग्णालयांच्याकडून ह्या सुविधा देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. यांचा आढावा घेण्याच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी शहरातील या रुग्णालयांचा आढावा घेतला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, धर्मादायकडून सवलती मिळणा-या रुग्णालयांनी गरिबांना मोफत सुविधा देणे आवश्यक आहे. अशा सुविधा न देणा-या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सरकारी सवलती घेणा-या रुग्णालयांनी सेवा पुरविणे बंधनकारक आहे. ही पुरवण्यामध्ये चालढकल करणा-या रुगणालयावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देशमुख यांनी दिलेल्या आहेत.
देशमुख म्हणाले, शासनाने ठरवून दिलेले नियमावली सर्व रुग्णांलयानी पाळणे आवश्यक आहे. या रुग्णालयांचे ऑडिट वेळेवर होणे आवश्यक आहे. अनेक रुग्णालयांचे ऑडिट वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णालयांवर तातडीने समितीने नेमून कारवाई होणे आवश्यक आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात अशी तब्बल ५५ रुग्णालय आहेत. गरीब रुग्णांना या सेवेची माहिती देणारे फलक रुग्णालयाच्या समोरील बाजूला लावणे आवश्यक आहे.
-------