पिंपरी : चऱ्होलीतील चोविसावाडी, दत्तनगर या भागात मंगळवारी (दि. ५) शेतात काम करणाऱ्या महिलांना दुपारी चारच्या सुमारास बिबट्यासदृश प्राणी नजरेस पडल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. त्या ठिकाणी आढळलेल्या प्राण्याच्या पायाचे ठसे देखील घेतले होते. त्यावरून तो बिबट्या नसून, तरस असल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. चोविसावाडी येथील काळी भिंत असलेल्या परिसरात नागरी वस्तीसह बागायती शेतीचे क्षेत्र आहे. मंगळवारी दुपारी येथील एका शेतात काम करणाऱ्या काही महिलांना बिबट्यासदृश प्राणी दिसला होता. महिलांनी आरडाओरडा केल्यावर तो प्राणी जवळच असलेल्या झुडपांत निघून गेला होता. या वेळी महिलांनी तो बिबट्या असल्याचे, तर काही रहिवासी तो वाघ असल्याचे सांगत होते. माहिती मिळताच पुणे वन विभागाच्या व महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून, प्राण्याचे पाच-सहा ठिकाणचे पायाचे ठसेही घेतले होते. मात्र, ठशांच्या पाहणीत तो बिबट्या नसून तरस असल्याचे आढळून आले आहे. हा प्राणी दिघी येथील दाट झाडीच्या क्षेत्रातून या परिसरात आला असल्याचा अंदाज वन विभागातर्फे वर्तविण्यात आला. तसेच ज्यांनी हा प्राणी बघून बिबट्या असल्याचे सांगितले होते. त्यांना बिबट्या व तरसाचे छायाचित्र दाखविण्यात आले. त्या वेळी त्यांनी तरसाचे छायाचित्र असलेला प्राणी दिसला असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच, मंगळवारनंतर तीन दिवसांत कोठेही हा प्राणी आढळल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आलेले नाही. वन विभागातर्फे दररोज परिसराची पाहणी करण्यात येत आहे. पुन्हा आढळल्यास त्या ठिकाणी पिंजरा ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.(प्रतिनिधी)
चऱ्होलीत बिबट्या नव्हे, तरस!
By admin | Published: January 09, 2016 1:35 AM